Weather Alert : राज्यातील आज पावसाची स्थिती कशी असेल? हवामान विभागाकडून अंदाज जारी

न्यूज लाईन नेटवर्क

मुंबई : राज्यात आज पावसाची स्थिती कशी राहिल यासंदर्भात भारतीय हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, उत्तर मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं राज्यात आज पालघर आणि ठाणे येथे पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, राज्यात ठिकठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे.

मध्यप्रदेशात कमी दाबाचा पट्टा

भारतीय हवामान विभागानं उत्तर पश्चिम मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

आयएमडीकडून मान्सूनचा उर्वरित अंदाज जाहीर

भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला. पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सन 2021 च्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.