अहमदनगर:-काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे, शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी ‘वेटिंग’ करावे लागत आहे.नेप्ती नाकाजवळील स्मशानभूमीमध्ये अनेक पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात येत असल्याने तेथील यंत्रणा व जागांच्या मर्यादामुळे अंत्यसंस्कारांसाठी थांबून राहावे लागत आहे.
अमरधाम परिसरात भयाण चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोनाबाधितांवर येथील अमरधाममध्ये अंत्यविधी केला जातो. त्यासाठी महापालिकेने दोन विद्युत दाहिन्यांची व्यवस्था केलेली आहे. साधारणपणे एका मृतदेहासाठी दीड तासांचा कालावधी लागतो.सकाळी १० वाजता दोन्ही विद्युत दाहिन्या सुरू करण्यात आल्यानंतर मृतांच्या नातेवाईकाना आपला नंबर येईपर्यंत थांबावे लागत आहे. पॉजिटीव्ह आल्यानंतर रुग्णालयात बेड साठी वेटिंग ते दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी वेटिंग अशी फरफट सध्या सुरु आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही सुटका नाहीच अशी भयाण परिस्थिती सध्या दिसत आहे.