
भारत आणि पाकिस्तान दरम्यान यंदा तीन टी-२० सामने होण्याची शक्यता आहे. असे झाले, तर आठ वर्षांनंतर भारत व पाकिस्तानात द्विपक्षीय क्रिकेट खेळले जाईल. या आधी डिसेंबर २०१२ मध्ये टी-२० व एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. त्यातील टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. एकदिवसीय सामन्यांची मालिका मात्र पाकिस्तानने २-१ अशी जिंकली होती. पाकिस्ताने क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार त्यांना या मालिकेची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यात आयसीसीच्या बैठकीत या बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र अद्याप असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. ३० मार्च रोजी भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. त्यात अशी मालिका खेळवण्याबाबत संमती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला होता, त्यामुळे आता दोन्ही देशांत क्रिकेट सुरू झाले, तर भारताला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जावे लागणार आहे.