श्रीलंकेला नमवताच टीम इंडिया बनली ‘नंबर 1’, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाशी केली बरोबरी

न्यूजलाईन मीडिया

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत एका दगडांत दोन पक्षी मारले आहेत. कर्णधार शिखर धवनने श्रीलंका मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. यासोबतच भारतीय संघ ‘नंबर 1’ बनला आहे. पण हा क्रमांक भारताने ICC रँकिंगमध्ये नाही तर एका वेगळ्याच रेकॉर्डमध्ये मिळवला आहे. भारतीय संघ एकाच विरोधी संघासोबत सर्वाधिक वेळा विजय मिळवणाऱ्या संघाच्या पंगतीत बसला आहे.

कोलंबोमधील पहिल्या सामन्यातील विजयासोबत भारताने श्रीलंकेविरुद्ध  160 वा वनडे सामना खेळत 92 वा विजय मिळवला. भारतीय संघाने एकाच प्रतिस्पर्ध्याविरोधात मिळवलेल्या विजयांची सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच भारताने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघासोबत 138 वनडेमध्ये 92 वेळा विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने देखील श्रीलंका संघाविरुद्धच 92 सामन्यात विजय मिळवला आहे.

‘या’ बाबतीत पाकिस्तान पुढे

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघानी सर्वाधिक वेळा श्रीलंका संघाविरोधातच विजय मिळवला आहे. मात्र भारताला हे 92 विजय मिळवण्यासाठी 160 सामने खेळावे लागले. तर पाकिस्तानने भारतापेक्षा 5 वनडे कमी म्हणजेच 155 वनडे खेळत हे विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध 61 वनडेमध्ये विजय मिळवला आहे.

सचिननंतर धवनने केली कमाल

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच कर्णधार असणाऱ्या शिखरने कर्णधार म्हणून सलामीच्या सामन्यात 86 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात केलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्कोर आहे. याआधी 1996 मध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधार म्हणून डेब्यू करताना 110 रन ठोकले होते.