शिष्यवृत्तीच्या वेळापत्रकात तिस-यांदा बदल

न्यूज लाईन नेटवर्क

पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत तिसऱ्या वेळी बदल करण्यात आला आहे. ८ ऑगस्टला होणारी ही परीक्षा ९ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार आहे.

वारंवार बदलामुळे विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम
कोरोना प्रादुर्भावमुळे २०२०-२१ च्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या पूर्व व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठ ऑगस्टला होणार होत्या; मात्र त्याच दिवशी अन्य परीक्षा असल्यानं ही परीक्षा नऊ ऑगस्टला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. वारंवार परीक्षा रद्द होणं, पुढं जाणं यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अतिवृष्टीचं कारण
शासनाने पुन्हा नव्याने आदेश काढत ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सबंधित शाळांच्या लॉगिंगला २७ जुलैला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेतल्या जातात.

फेब्रुवारीतील परीक्षा ऑगस्टमध्ये
या वर्षी या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु कोरोना प्रादुर्भावमुळे ही परीक्षा होवू शकली नव्हती. त्यामुळे शासनाने ३० मार्चला पत्र काढत ही परीक्षा २३ मे घेण्यास मान्यता दिली होती; परंतु पुन्हा कोरोनामुळे ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा ८ ऑगस्टला कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यास शासनाने मान्यता दिली होती. तसे पत्र राज्य शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले होते. त्यानंतर ही परीक्षा नऊ ऑगस्टला होणार होती. आता ही परीक्षा १२ ऑगस्टला होणार आहे.