वीज पडल्याने उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये ४९ जणांचा मृत्यू

न्यूज लाईन नेटवर्क

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वीज पडल्याने उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या घटनांमध्ये रविवारी ३० जणांचा प्राण गेला. यामध्ये प्रयागराजमध्ये १४, कानपूर देहातमध्ये पाच, तर कौशंबीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे फिरोझाबादमध्ये तीन आणि उन्नाव, तसेच चित्रकूटमध्ये प्रत्येक दोन जणांना वीज पडल्याने मृत्यू झाला.

राजस्थानमध्येही वीज पडल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूरमध्ये झाले. रविवारी राज्यातील वेगवगळ्या भागांमध्ये वीज पडल्याच्या घटनांमध्ये १७ जण जखमी झाले. जयपूर, ढोलपूर, कोट्टा आणि जहालवार जिल्ह्यांमध्ये काल मान्सूनचे दमदार आगमन झाले.

उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने आवश्यक ती सर्व मदत करावी आणि योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे गाझीपूर, फिरोझाबाद, बलियामध्ये काही ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

राजस्थानमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान अंबर किल्ल्याजवळ रविवारी सायंकाळी वीज पडल्याची घटना घडली. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले.

शेळ्या चरायला नेणारी कोट्टामधील कानवास पोलिस स्थानकांतर्गत येणाऱ्या परिसरातील चार मुलांबरोबर जहालवारमधील एका तरुणाचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. ढोलपूरमधील बारी परिसरातील तीन मुलांचा वीज पडून मृत्यू झाला. राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.