विष्णुपरीचे सहा दरवाजे उघडले आषाढधारांनी नांदेड जिल्हा चिंब

संजीव कुलकणी :  न्यूज लाईन नेटवर्क

नांदेड :  नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बुधवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सततच्या पावसामुळे मुखेड तालुक्यातील कामजळगा येथे एक तरुण पावसाच्या पाण्यात वाहून गेला. किनवट, हिमायतनगर या तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदीकाठच्या गावांना मोठी झळ बसली. अशीच स्‍थिती गोदावरी व इतर उपनद्यांच्या काठावर असलेल्या गावांमध्ये निर्माण झाली असून ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. दरम्‍यान शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे.
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ होत असून आतापर्यंत 3,4,7,11,13,14 या क्रमांकाचे एकूण सहा दरवाजे उघडण्यात आले असून 2 हजार 502 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळी 354.50 मीटर असून प्रकल्प 90 टक्के भरला आहे.
प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून जुन्या नांदेड शहराजवळ दासगणू पुलाच्या काठोकाठ पाणी पोहोचले आहे.
जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. बुधवारी सरासरी 29.2 मि.मी.पाऊस झाला होता. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून गुरूवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. सर्वात जास्त पाऊस किनवट तालुक्यात झाला असून 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे खरीपांच्या पिकांसह हळद, उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.  माहूर तालुक्यात 68 मि.मी पाऊस झाला असून भोकर तालुक्यात 67 मि.मी पावसाची नोंद झाली.
हिमायतनगर- 62 मि.मी., धर्माबाद-60.मि.मी., बिलोली-59.मि.मी., हदगाव-55.मि.मी., लोहा-55.मि.मी., देगलूर-53.2.मि.मी., कंधार-47.मि.मी., उमरी-42.मि.मी., मुखेड-40.मि.मी., अर्धापूर-37.मि.मी., मुदखेड-35.मि.मी., नायगाव-32.मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संकलित केली जात आहे.