राज ठाकरेंचा तीन दिवस पुण्यात मुक्काम, दौऱ्यातील संवाद कार्यक्रमांना आजपासून सुरूवात

न्यूज लाईन नेटवर्क

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यातील संवाद कार्यक्रमांना आजपासून सुरुवात झाली आहे. राज ठाकरे पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. आजपासून तीन दिवस मनसे अध्यक्ष पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या काळात ते शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारेत.

आज पहिल्या दिवशी मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि राज्य शहर उपाध्यक्ष अशा 16 जणांशी तसंच शहर संघटक ,उपशहर अध्यक्ष,शहर सचिव विभाग अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माणविद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उद्या प्रभाग अध्यक्ष तसंच आजी माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. काल नाशिकवरून पुण्यात राज ठाकरे यांचं आगमन झालं. गेल्याच आठवड्यात मनसेच्या नवीन कार्यालयाचं उदघाटन ही राज ठाकरे यांनी केले होते.

नाशिकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा आणि अमित ठाकरेंकडे मनविसे अध्यक्ष पद सोपवण्याची कार्यकर्त्यांची मागणी यामुळं मनसे परत चर्चेत आली आहे. 2012 साली पुण्यात मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. 2017 ला ही संख्या घसरून 2 वर आली. आता 2022 मधील पालिका निवडणूक जवळ येतं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.