महाड दुर्घटनाग्रस्तांना केंद्र सरकारचा मदतीचा हात, मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली ‘इतक्या’ लाखांची मदत


न्यूज लाईन नेटवर्क

महाड: सततच्या मुसळधार पावसाने कोकणात मोठा धूमाकुळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील स्थिती बिकट झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यातच भर म्हणून महाडच्या तळीये गावात गुरुवारी दरड कोसळली. 80 कुटुंबांची वाडी वस्ती असणाऱ्या वाडी घरांवर दरड कोसळल्याने उद्धवस्त झाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाडच्या दरड कोसळल्य़ाच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून महाडमधील मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांना मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले, “महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.”

रायगडच्या महाडमध्ये तळीये गावात दरड कोसळून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दरड कोसळल्यानं ही मोठी दुर्घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. याठिकाणी मदतीसाठी NDRFचं पथक दाखल झालं आहे. महाडच्या तळीये गावात माळीणची पुनरावृत्ती होतेय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झालेत. गावात प्रतिक्रिया द्यायला लोकच राहिले नाहीत. दूरवर असलेलं एकमेव घर वाचलं आहे. अख्खी वाडी उद्ध्वस्त झाली.