तालिबानची आगेकूच, कंदहारमधून भारतीय दूतावासाचे ५० अधिकारी – कर्मचारी माघारी

न्यूज लाईन नेटवर्क 

नवी दिल्ली : भारताने आपले ५० राजनैतिक अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांना अफगाणस्तानची राजधानी कंदहार येथील दूतावासातून सुरक्षेच्या कारणास्तव हलवले आहे, कारण तालिबानने काबूलच्या दक्षिणेकडील भागाचा ताबा घेतला आहे.

पन्नास राजनैतिक अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांना भारतीय हवाई दलाच्या शनिवारी पाठवण्यात आलेल्या खास विमानाने मायदेशी आणण्यात येत आहे. त्यात इंडो – तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांचाही समावेश आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, की तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही काळासाठी भारतात आणले असून कंदहार भागात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. राजदूतावास बंद करण्यात आलेला नसून स्थानिक कर्मचारी तेथे काम करीत आहेत. भारत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद करण्यात आलेला नाही. भारतीय अधिकाऱ्यांना केवळ काही काळासाठी मायदेशी आणले आहे. हा तात्पुरता उपाय असून स्थिती शांत होईपर्यंत आम्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत पाठवणार नाही. व्हिसा व दूतावास सेवा काबूलमधील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून कायम राहणार आहे.

प्रवक्ता म्हणाला, की अफगाणिस्तान हा आमचा महत्त्वाचा भागीदार असून तो सार्वभौम व लोकशाही देश असून तेथील शांततेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मंगळवारी असे सांगण्यात आले होते, की काबूलमधील भारतीय दूतावास बंद करण्यात येणार नाही. कंदहार व मझार ए शरीफ येथे हे दूतावास आहेत. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाहून आम्ही प्रतिसाद देत आहोत.

अमेरिकेने सैन्य माघारी घेताच तालिबानने अफगाणिस्तानात उच्छाद मांडला असून ऑगस्ट अखेरीस अमेरिकेचे सैन्य माघारी जाणार आहे. मझार ए शरीफ येथील दोन परदेशी कार्यालये बंद करण्यात आली आहेत असेही सांगण्यात आले होते.

इस्लामाबाद : अफगाणिस्तानात यादवी युद्धाची शक्यता गृहीत धरून त्याचे मायदेशी होणारे परिणाम हाताळण्यासाठी एक योजना तयार केली असून आम्ही अफगाणिस्तानात शांतता निर्माण करण्यासाठी मदतनीस आहोत, हमीदार नाही, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

पाकिस्तान हा अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेत एकमेव मदतनीस आहे, असे मेजर जनरल बाबर इफ्तेकार यांनी सांगितले. पाकिस्तानने अफगाणिस्तानात मध्यस्थी करताना डावे उजवे केलेले नाही. अफगाणिस्तानने नेता निवड करण्याची गरज आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानातील परिस्थितीचे पडसाद त्यांच्या देशातही उमटू शकतात याची जाणीव आहे. त्यामुळे पाकिस्तान उपाययोजना करीत आहे. त्यांनी सांगितले, की सीमेवरील सुरक्षा ९० टक्के  वाढवण्यात आली असून २६११ कि.मी. सीमेवर कुंपण घालण्यात आले आहे. पाकिस्तानची सध्याच्या सुरक्षा परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील शरणार्थी  पाकिस्तानात येण्याची शक्यता असून त्यामुळे आपत्कालीन योजना तयार करण्यात आली आहे.

अमेरिकी सैनिकांनी अफगाणी सैनिकांना प्रशिक्षण दिले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला नाही, कारण तालिबानचे हल्ले परतवण्यात त्यांना अपयश येत आहे.

गेल्या वीस वर्षांत अमेरिकी लष्करातर्फे अफगाण नॅशनल आर्मीला प्रशिक्षण देण्यात आले. अमेरिकेने लाखो डॉलर्स खर्च करूनही अफगाणी सैन्याला तालिबानशी लढणे अवघड  जात आहे. अफगाणिस्तानातील भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी सांगितले,की तेथे  पाकिस्तानचे हितसंबंधही जपले जातील कारण त्या देशात आमची गुंतवणूक आहे.