जून व जुलै महिन्यातील केंद्राचे मोफतचे धान्य एकाच वेळी वाटप करा – ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले

न्यूज लाईन नेटवर्क

अकोले : तालुक्यात जून मध्ये वाटप होणारे मोफत धान्य जुलै महिना संपत आला तरी वाटप झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोना संकटामुळे आधीच आदिवासी, दुर्गम तालुक्यात रोजगार नाही. शेतीची कामे पाऊस नसल्याने खोळंबली आहे. रोजगार नसल्याने आदिवासी घरातच बसून आहेत. त्यामुळे किमान मोफत धान्य मिळावे ही माफक अपेक्षा येथील गरीब जनतेची आहे. मात्र तालुका प्रशासन याबाबत उदासीन दिसत असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार कमी उत्पन्न असलेल्या जनतेसाठी मोफत धान्य योजना सुरू करून कोरोना काळात किमान गरिबाच्या पोटाला दोन घास मिळावे हा हेतू होता. मात्र ढिसाळ कारभारामुळे हा हेतू साध्य होताना दिसत नाही.

दरम्यान मोफत धान्य प्रत्येक गावाच्या दुकानदाराकडे पोहचले आहे. हे दुकानदार धान्य घरात साठवून का ठेवतात हा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असून योग्य वेळी हे धान्य वाटप केले नाही तर नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. दरम्यान राज्य सरकारकडून होणारा मोफतचा धान्य पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांनी येत्या दोन दिवसात वाटप केला नाही, तर आदिवासी विकास परिषद संबधित दुकानदाराला आणि प्रशासनाला जबाबदार धरून स्वत: जिथे धान्याचे दुकान आहे. तिथे ग्रामस्थांना घेऊन धान्य वाटप करेल असा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंद के, सचिव पांडुरंग खाडे, सुरेश भांगरे, विजय भांगरे यांनी दिला आहे.