गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त, अरणगाव शिवारात जामखेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

प्रविण निघुडे, न्यूज लाईन नेटवर्क

अरणगाव : अरणगाव शिवारात पोलिसांनी हातभट्टीवर धाड टाकून गावठी दारूचा बनवण्याचा अड्डा उध्वस्त केला आहे. या धाडीत हातभट्टीवरील सर्व रसायन आणि इतर साहित्य पोलिसांनी नष्ट केले आहे.  ही धडाकेबाज कारवाई जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी केली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील गहिनीनाथ बापु पवार हा इसम अरणगाव शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचा अड्डा चालवत असून तो त्याच ठिकाणी गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानंतर बुधवारी दि ०४ ऑगस्ट रोजी जामखेड पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे अरणगावमध्ये धाड टाकली.

या धाडीत सुमारे ४१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत जागेवर नष्ट केला. यामध्ये ४० हजार रूपये किमतीचे कच्चे रसायन तर ०१ हजार पाचशे रूपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारूचा साठा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस काँस्टेबल रोहित मिसाळ यांनी आरोपी गहिनीनाथ पवार याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

या कारवाईच्या पथकात पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे, पोलीस नाईक सचिन आडवल, प्रकाश वाघ, पोलीस काँस्टेबल सागर सुलाने, रोहिदास नवगिरे, संभाजी कोतकर, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काँस्टेबल बाळू खाडे सह आदींचा समावेश होता. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे हे पुढील तपास करत आहेत.