ख्रिस गेलचा टी – २० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; आजवर कोणत्याही फलंदाजाला जमले नाही

न्यूज लाईन नेटवर्क

नवी दिल्ली: टी – २० क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने नवा विक्रम केला आहे. ४१ वर्षी गेलने टी – २० क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे जो आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाला करता आला नाही.
सध्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गेलने क्रिकेटमधील या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये १४ हजार धावाांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
तिसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १४१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ख्रिस गेलने ३८ चेंडूंत ६७ धावांची वादळी खेळी केली. यात ७ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. गेलच्या फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने विजयाचे लक्ष्य १५ व्या षटकात चार विकेटच्या बदल्यात पार केले. इतक नव्हे, तर या विजयासह त्यांनी पाच सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत गेलची कामगिरी खराब झाली होती. तो ४ आणि १३ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. पण तिसऱ्या सामन्यात गेलने अर्धशतक झळकावले. या डावातील ९व्या षटकात ऍडम जंपाला षटकार मारत गेलने १४ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने सलग तीन षटकार मारून ३३ चेंडूंत अर्धशतक पार केले.
गेलने १६ मार्च २०१६ रोजी इंग्लंडविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात नाबाद १०० धावा केल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षांनी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५० हून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमंध्ये गेल्यानंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने १० हजार ८३६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा शोएब मलिक १० हजार ७४१ धावांसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉनर १० हजार ७ धावांसह चौथ्या, तर भारताचा कर्णधार विराट कोहली ९ हजार ९९२ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.