कोरोनाचे आव्हान पेलत ‘टोक्यो ऑलिम्पिक’ क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ!

न्यूज लाईन नेटवर्क

टोक्यो : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीला अखेर शुक्रवार पासून प्रारंभ होणार आहे. एकीकडे सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आणि त्याचवेळी कोरोनासारख्या भयंकर साथीवर विजयश्री मिळवण्याच्या निर्धाराने भारताचे १२० महारथी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदा भारताचे शिलेदार ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करतील, अशी आशा देशभरातील चाहते बाळगून आहेत.

गेल्यावर्षी कोरोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. यंदाही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. मात्र जैव-सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत स्पर्धेच्या आयोजनासाठी ऑलिम्पिकनगरी सज्ज झाली आहे. या स्पर्धेत २०४ देशांच्या ११ हजारांहून अधिक खेळाडूंमध्ये पदकांसाठी चढाओढ रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यात बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम आणि हॉकीपटू मनप्रीत सिंग भारताचा तिरंगा फडकावणार असून त्यानंतर पुढील १६ दिवस आपले खेळाडू पदकासाठी सर्वस्व पणाला लावतील. भारताच्या चमूत ६८ पुरुष आणि ५२ महिला खेळाडूंचा समावेश आहे.

नेमबाजीमध्ये युवा मनू भाकर, सौरभ चौधरी यांच्यासह अनुभवी राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांनी गेल्या दोन वर्षांत पदकांचा धडाका लगावला असून ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. लंडन येथील २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके कमावली होती. त्यावेळच्या पदकविजेत्यांपैकी मेरी कोम यंदाही बॉक्सिंगमध्ये भारताच्या आव्हानाची धुरा सांभाळणार आहे.

२०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्यपदकाला गवासणी घालणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यंदा सुवर्णावर मोहोर उमटवण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेरील घटनांमुळे कुस्ती क्रीडाप्रकार चर्चेत आला असला, तरी बजरंग पुनिया, विनेश फोगट यंदा पदक जिंकण्यासाठी आतुर आहेत.

स्टीपलचेसपटू अविनाश साबळेवर प्रामुख्याने महाराष्ट्रातील चाहत्यांचे खास लक्ष असेल. भालाफेकपटू नीरज चोप्रासुद्धा पदकाचा दावेदार आहे. त्याशिवाय जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारी तिरंदाज दीपिका कुमारी पदकाचा वेध घेईल, अशी आशा आहे. हॉकीमधील सुवर्णकाळ परत आणण्याचे आव्हान मनप्रीतच्या योद्धय़ांपुढे असेल. आठ वेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाला १९८० नंतर एकदाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

वेटलिफ्टिंग आणि तलवारबाजी यांमध्ये अनुक्रमे मीराबाई चानू आणि सीए भवानी देवी या एकमेव महिला खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याचप्रमाणे जिम्नॅस्टिक्स, जुडोमध्येही भारताने एकेक खेळाडू रिंगणात उतरवला आहे. जलतरणमध्ये प्रथमच भारताचे तीन जण ऑलिम्पिकसाठी पात्र झाले असून टेनिसमध्ये अनुभवी सानिया मिर्झाच्या साथीने अंकिता रैना खेळताना दिसेल. त्याशिवाय सुमीत नागललासुद्धा नशीबाच्या बळावर ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता हे सर्व क्रीडापटू मिळून भारताला प्रथमच ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठून देणर का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेमधील सुवर्णपदक विजेत्याला ७५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकाच्या संघटनेला २५ लाख रुपये रक्कमही दिली जाणार आहे, अशी घोषणा गुरुवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केली. ‘आयओए’च्या सल्लागार समितीने रौप्यपदक विजेत्याला ४० लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या प्रत्येक क्रीडापटूला एक लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे.

सुवर्णपदक विजेत्याला ७५ लाखांचे इनाम

२५ भारत २५व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असून नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २८ पदके भारताने २४ ऑलिम्पिक स्पर्धात जिंकली आहेत.

१३ गेल्या १३ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८मध्ये भारताने ऑलिम्पिकमधील अखेरचे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यावेळी नेमबाज अभिनव बिंद्राने हा पराक्रम केला होता.

पदकाचे दावेदार

नेमबाजी : राही सरनोबत, मनू भाकर, सौरभ चौधरी

बॅडमिंटन : पी. व्ही सिंधू, चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी

कुस्ती : बजरंग पुनिया, विनेश फोगट

तिरंदाजी : दीपिका कुमारी, अतानू दास

अ‍ॅथलेटिक्स : अविनाश साबळे, नीरज चोप्रा

बॉक्सिंग : मेरी कोम, अमित पांघल

टेबल टेनिस : शरथ कमल-मनिका बत्रा

हॉकी : भारताचा पुरुष संघ